शाहूपुरी पोलिसांनी बंद केली दुकाने

ही तर मोगलाई असल्याची शिवेंद्रसिंहराजे यांची प्रतिक्रिया

सातारा (प्रतिनिधी) : जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लागू केलेल्या निर्बंधाच्या विरोधात मंगळवारी व्यापारी आक्रमक झाले. भवानी पेठेतील मोती चौकात काही व्यापाऱ्यांनी हे नियम झुगारत दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच शाहूपुरी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.

ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा कडक नियम लागू झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आक्षेप नोंदविला.

जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सातारा जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करून अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बाजारपेठेत मिठाई, बेकरी, दुग्धालय यांना सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या कठोर नियमाच्या विरोधात कापड व्यावसायिक, इतर दुकानदारांची मंगळवारी सकाळीच तीव्र प्रतिक्रिया आली. मोती चौकात राजपथावरील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या निर्बंधांचा निषेध केला. काही दुकानदारांनी सकाळी नऊ वाजताच चक्क दुकाने उघडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ जाऊन दुकाने बंद केली साताऱ्यात भाजीमंडई वगळता इतर सर्व व्यापारी वर्तुळात प्रचंड शांतता होती. साताऱ्यात बंदचा परिणाम म्हणून रोजची वाहतूक सुध्दा तुरळकच होती. शाळा मंदिरे बाजारपेठा बंद राहिल्याने राजपथ कर्मवीर पथ राधिका रोडवर सकाळपासूनच सामसूम जाणवत होती.

व्यापारी वर्तुळात वाढती अस्वस्थता

गुढीपाडवा अवध्या आठवडयावर येऊन ठेपलेला असताना कापड व सराफ बाजार छोटे विक्रेते व्यावसायिक यांच्या व्यवसायावर नियमांची संक्रांत आल्याने व्यापारी वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे. शनिवारी रविवारी लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला दंड करा त्यालाही हरकत नाही मात्र व्यवसाय बंद ठेवल्यास आमचे अर्थार्जन बंद पडणार, आस्थापनांची देखभाल दुरुस्ती कामगारांचे पगार, इतर देणी हे खर्च उत्पन्नच नसल्याने आवाक्याबाहेरच जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या नियमांचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी सातारा शहर व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात व्यापारी संघटनेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.

ही तर नियमांची मोगलाई – शिवेंद्रराजे

साताऱ्याचा व्यापारी वर्ग करोनाच्या दुष्ट चक्रातून सावतोय. त्यामुळे पुन्हा कठोरपणे निर्बंध लादण्याचा प्रकार म्हणजे मोगलाई सुरू असल्याची सणसणीत टीका सातारा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. ते म्हणाले प्रशासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली आहे मात्र त्यांना कच्चा माल पुरवणारी दुकाने मात्र बंद आहेत अशा परवानगीचा उपयोग नाही. आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन दंडात्मक कारवाई इतर नियम याला सुध्दा व्यापारी प्रशासनाला सहकार्य करावयास तयार आहेत. ज्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुकानात माल भरलाय त्यांनी ऐन सणासुदीत नियम म्हणून दुकाने बंद ठेवायची, हा कसला न्याय जी दुकाने सुरू आहेत तेथे गर्दी झाल्यास करोना संक्रमणाची भीती नाही काय? मग व्यापारी वर्गाने असे काय केले आहे? ही तर सरळ सरळ नियमांच्या निमित्ताने केलेली मोगलाई असल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

सातारा पालिकेच्या पथकाने अंशतः लॉकडाऊन जाहीर असताना मोती चौक ते ५०१ पाटी या दरम्यान दुकाने सुरू ठेवणाऱ्या सात दुकान मालकांना दंड केला. पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेपर्यंत १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सदाशिव पेठेतील मोटार स्टँन्डच्या मंडई परिसरातील भाजीच्या दुकानांसह किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सुध्दा सर्रास सुरू होती. साताऱ्यात प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरचा व्यापार सक्तीने बंद असला तरी सेवा रस्ते व इतर गल्लीबोळातील दुकानदारांनी दुकानाचे शटर अर्धवट खाली ओढून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here