नवी दिल्ली/ प्रतिनिधी

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील 100 कुंभार कुटुंबांना आज इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने देशातील कुंभारांना सक्षम बनविण्यासाठी ‘कुंभार सशक्तीकरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील दहा तर परभणी जिल्ह्यातील पाच गावातील १०० कुंभारांना प्रशिक्षण देण्यात आले. आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कुंभारांना दूरदृष्य प्रणालीद्वारे इलेक्ट्रीक चाके प्रदान करण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यावेळी उपस्थित होते.

देशातील कुंभारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रासह देशाच्या अन्य दुर्गम भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असेही ते म्हणाले, त्यांनी यावेळी लाभार्थी कुंभारांसोबत संवाद साधला

या योजनेंतर्गत देशभरातील कुंभारांना १८ हजार इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली असून त्याचा सुमारे ८० हजार लोकांना लाभ मिळाल्याचे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here